पाच वर्षांच्या श्लोक गोगटेला ‘लिटिल सिंघम’च्या भूमिकेसाठी प्रथम पारितोषिक
श्रीकांत खुपेरकर | पनवेल:
आज अनेक लहान मुले मोबाईलवर गेम खेळण्यात आणि टीव्ही पाहण्यात गुंतलेली दिसतात. मात्र, पनवेल येथील पाच वर्षांचा श्लोक निखिल गोगटे आपल्या स्मरणशक्तीने, आत्मविश्वासाने आणि संस्कारांच्या आवडीने वेगळा ठरत आहे.
श्लोक हा पनवेल येथील गुरुकुल शाळेत शिकत आहे. पनवेलमधील निल पार्क सोसायटीमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त दहा दिवस विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते. या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी मुलांना आपल्या भूमिकेविषयी ३० सेकंद ते एक मिनिट बोलायचे होते.

या स्पर्धेत श्लोकने ‘लिटिल सिंघम’ची भूमिका साकारली. कोणतीही भीती न बाळगता, स्पष्ट उच्चारांत आणि आत्मविश्वासाने त्याने आपली भूमिका सादर केली. त्याच्या या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली आणि त्याला प्रथम पारितोषिक मिळाले.
श्लोकचे वैशिष्ट्य म्हणजे तो टीव्ही आणि मोबाईलचा फारसा वापर करत नाही. तरीही त्याने कमी वेळात भूमिकेची तयारी करून ती उत्तम प्रकारे साकारली. त्याची स्मरणशक्ती चांगली असून त्याला विविध श्लोक, स्तोत्रे आणि भगवत गितेच्या पंधराव्या अध्यायाचे पाठांतर करण्याची आवड आहे.
रामायण आणि महाभारतातील गोष्टी ऐकायला त्याला विशेष आवडते. या गोष्टी ऐकल्यानंतर तो स्वतःच्या शब्दांत त्या पुन्हा सांगतो.
श्लोकची आजी विद्युलता विलास गोगटे या सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करतात. लहान वयातच मुलांमध्ये साधनेचे महत्त्व आणि चांगले संस्कार रुजावेत, असे त्यांना वाटते. तसेच श्लोकच्या आजी प्रतिभा चंद्रकांत महाजनी या भगवद्गीतेचे वर्ग घेतात. त्यांच्याकडूनही श्लोक गीतेचे शिक्षण घेत आहे.
श्लोकच्या या उदाहरणातून मुलांच्या आवडी जोपासणे, त्यांना गोष्टी सांगणे, पाठांतरासाठी प्रोत्साहन देणे आणि सांस्कृतिक मूल्यांची ओळख करून देणे किती महत्त्वाचे आहे, हे दिसून येते. मोबाईल आणि टीव्हीच्या वाढत्या वापराच्या काळात श्लोकची ही कामगिरी पालकांसाठीही प्रेरणादायी ठरते.







